"आयुष्याचं क्षितीज"
आयुष्य हे असंच जगायचं असतं,
कुणीतरी मरायचं, कुणी तरी उरायचं असतं,
सांगायला तर सारं जगच आपलं असतं,
पण इथे कुणीच कुणाचं असायचं नसतं,
नाती रक्ताची म्हणुन त्यांना जपायचं असतं,
असली खुपणारी तरी त्यांना तोडायचं नसतं,
शब्दांनाही जरा जपुन वापरायचं असतं,
झाल्याच कधी जखमा तरी लगेच विसरायचं असतं,
दु:खांना वेदनांना सोबत घेऊन हसायचं असतं,
असे जन्म किती झाले हे कुणी मोजायचं नसतं,
चालतांना नेहमी सा-यांबरोबर चालायचं असतं,
एखादा पडलाच तर दुस-यांनं उचलायचं असतं,
अनेक समस्या आल्या तरी घाबरायचं नसतं,
समोर उद्दिष्ट ठेवुन आयुष्य जगायचं असतं
मिठीला मृत्युच्या कधी घाबरायचं नसतं,
वेळेवर आला म्हणत घट्ट बिलगायचं असतं,
आयुष्याचं क्षितीज हे असंच असतं,
ध्येय उंच आणि आभाळ ठेंगणं भासवायचं असतं,
ध्येय उंच आणि आभाळ ठेंगणं भासवायचं असतं.

No comments:
Post a Comment